Nashik loksabha Seat Controversy : साताऱ्यात उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आता भाजपच्या तिकीटावर रणांगणात उतरतील. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचं... साताऱ्याचं जरी ठरलं असलं तरी नाशिकचं (Nashik Loksabha) काय हाच प्रश्न आहे. कारण साताऱ्याची जागा ही खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची... लोकसभेसाठी साता-याची जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडावी लागलीय. तेव्हा अजित पवारांच्या पक्षाला नाशिकची जागा मिळणार का? याची चर्चा सुरु झालीय.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात अजित पवारांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा मिळणार का? नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे असल्याने ती जागा एकनाथ शिंदे सोडणार का? नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लढणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
उदयनराजे भोसलेंना अजित पवार गटाने साताऱ्यातून घड्याळावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र उदयनराजेंनी ती धुडकावून लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली. साताऱ्याची जागा भाजपला सोडण्याच्या बदल्यात नाशिकची जागा पदरात पाडून घ्यायची असा प्रस्ताव अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचं समजतंय. उदयनराजेंना तिकीट जाहीर झाल्यानं नाशिकमधून भुजबळांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातंय. तेव्हा नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटलांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय... त्यामुळं मविआची डोकेदुखी वाढलीय. विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काँग्रेस उमेदवार आणि अपक्ष म्हणून त्यांनी एकूण तीन उमेदवारी अर्ज भरलेत, त्यामुळे आता सांगलीचा तिढा सुटणार तरी कधी? असा सवाल देखील विचारला जात आहे.
अजय बोरस्ते म्हणतात...
महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची आहे. शिवसेनेला विद्यमान हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्यायची आहे. मात्र दुसरया उमेदवाराची मागणी झाल्यास मी स्वतः निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत अजय बोरस्ते यांनी प्रचाराची तयारी केली आहे. दोघांचे प्रचार सुरू राहिले तर शिवसेनेलाच फायदा होईल ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे आम्ही सर्वजण काम करू असं सांगत नाशिक लोकसभेच्या उमेदवारी बाबत मी सुद्धा मैदानात असल्याचं स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका मांडली.