Pankaja Munde On Gopinath Gadh: भाजपचे दिवंगत दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज स्मृतिदिन. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर (Gopinath Gadh) भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत जाणार का? या प्रश्नावर स्पष्ट मत मांडलं. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर दाखल झाले होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी मी पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असा सवाल उपस्थित करत सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषण करताना कोणती भूमिका घेणार? यावर सर्वांचं लक्ष होतं.
पहिल्या पाच वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात जे अनुभव आले ते फार वेगळे आहेत, असं म्हणताच पंकजा भावूक झाल्याचं दिसून आलं. अश्रू दाबून आलेल्या नेत्यांचं मनात आभार मानून मी बोलायचा प्रयत्न करते, असं पंकजा म्हणाल्या. त्यावेळी पंकजांचा सूर नरमल्याचं दिसून आलं. मी मनात साठवून काहीही ठेवत नाही, माझी लेचीपेची भूमिका नाही. मी स्वच्छ पाटी घेऊन राजकारणात आले आहे. मुंडे साहेबांनी भाजपला सत्ताशिखरावर पोहोचवलं. माझे शब्द ठाम आहेत. राजकारणात कधी कधी कीर्तन केलं पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीत जाणार का? या विषयावर आपलं मत मांडलं.
मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. अमित शहा माझे नेते आहेत. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न होतोय. पंकजा मुंडे राजकारणात जी काही भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात. मी कुणासमोरही झुकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान, बाप गेला तरी अश्रू येऊ दिले नाहीत. निर्णय घेण्यासाठी आडपड्याची गरज नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी झुकणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे आपला निर्णय घेणार असल्याने आता बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.