श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : व्यसनाधीन व विक्षिप्त वागणाऱ्या पोटच्या मुलामुळे त्रस्त झालेल्या आईनेच मुलाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) घडला आहे. या घटनेमुळे यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलाला त्रासलेल्या आईने नातेवाईकांच्या मदतीने कट रचत गुंडामार्फत पोटच्या गोळ्याला संपवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Yavatmal Police) आईसह सहा आरोपींना अटक केली आहे.
चौसाळा जंगल परिसरात योगेश देशमुख या युवकाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांना खबर देणाऱ्यांची चौकशी केली असता तेच मारेकरी निघाल्याचे समोर आले आहे. तपासात आरोपींनाच हत्येची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. अमरावतीचा रहिवासी असलेल्या योगेशला घेऊन त्याची आई यवतमाळमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे आली होती आणि त्यांच्या मदतीने मुलाची हत्या करण्याचा कट तिने रचला होता. यासाठी तिने दोन सराईत गुन्हेगारांना योगेशच्या हत्येची सुपारी दिली. याकरता पाच लाखांची रक्कम देखील ठरवण्यात आल्याचे समोर आले आहे. सर्व आरोपींना लोहारा पोलिसांनी अटक केली आहे.
मुलाच्याच घरी रचला हत्येचा कट
"29 एप्रिल रोजी कुजलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आल्याच माहिती देण्यात आली होती. त्यावेळी आम्ही पथकासह चौसाळा येथील जंगलात गेलो. तिथे नाल्याजवळ एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. या तरुणाच्या पॅन्टची तपासणी केली असता त्यामध्ये एक चिठ्ठी सापडली. डॉक्टरांच्या उपचारांची ती चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर योगेश विजय देशमुख असे नाव लिहिण्यात आले होते. त्या चिठ्ठीवर तरुणाच्या आईचा मोबाईल नंबर होता. आम्ही त्या नंबरवर फोन केला तेव्हा त्याच्या आईने सांगितले की तो पंधरा दिवसांपासून त्याच्या आईकडे गेलाय असे सांगितले. त्याचे मामा प्रफुल्ल वानखेडे हे बांगरनगर येथे राहतात. मामाकडे जाऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की योगेश अक्षय तृतीयेपासून घरीच आलेला नाही असे सांगितले. तो त्याच्या दुसऱ्या मामाकडे गेलेला असावा असे प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही देवीनगर येथे पोहोचले तेव्हा तिथे योगेशची मावशी उषा चौधरी राहत असल्याचे समोर आले. उषा चौधरी यांच्याकडे चौकशी केली असता योगेश इथे आलाच नाही असे सांगितले. त्यानंतर आम्ही प्रफुल्ल वानखेडे याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, योगेश वेडसर असल्याने आईला त्रास देत होता. दारू आणि गांजा पिण्यासाठी आईकडे नेहमी पैसे मागायचा आणि तिला मारहाण करायचा. गेल्या 20 वर्षांपासून त्याची आई त्याला वैतागली होती. त्याची आई वंदना देशमुख, मावशी उषा, काका मनोहर चौधरी यांनी घरीच योगेशला संपवण्याचा कट रचला. यावरुन त्यांनी राहुल पठाडे आणि विकी भगत या दोन मारेकऱ्यांना पाच लाख रुपये देण्याचे कबुल केले. यानंतर दोघेही योगेशला 20 तारखेला घरातून घेऊन गेले आणि जंगलात गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मृत्यू न झाल्याने आरोपींनी त्याचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे," अशी माहिती लोहारा पोलीस ठाण्याचा ठाणेदार दिपमाला भेंडे यांनी दिली.
असा झाला उलघडा
योगेशच्या हत्येनंतर विकी आणि राहुल यांनी पाच लाख रुपये घेण्यासाठी त्यांनी योगेशच्या आई आणि मावशीवर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. यानंतर 29 एप्रिल रोजी विकीने डायल 112 वर फोन करून चौसाळा जंगलात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.