यवतमाळ : मराठा क्रांती मोर्चाबाबतच्या व्यंगचित्रप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि 'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहेत.
मराठा क्रांती मूक मोर्चाबाबत शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहे. यवतमाळच्या पुसद न्यायालयाने उद्धव ठाकरे, संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि मुद्रक प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावला आहे.
सामनात २५ सप्टेंबर २०१६ रोजी मराठा क्रांती मूकमोर्चा बाबत वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित झाले. शिवाय सैनिकांच्या मृत्यूबाबत विडंबनात्मक व्यंगचित्र देखील प्रकाशित झाल्यानंतर भावना दुखावल्याने पुसद येथील दत्ता सूर्यवंशी यांनी न्यायालयात खासगी फिर्यादपत्र दाखल केले होते. त्याची दखल घेऊन पुसद न्यायालयात हा खटला सुरु आहे.
दरम्यान, संबंधितांनी न्यायालयात तारखेवर जाणूनबुजून गैरहजर राहून प्रकरण लांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट आदेश जारी करण्याची मागणी फिर्यादीचे वकील आशिष देशमुख यांनी केली होती. या युक्तिवादावरून न्यायालयाने उद्धव ठाकरे यांचेसह सर्व चार आरोपींविरुद्ध वॉरंट बजावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुसद न्यायालयाच्या या वॉरंटमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे.