पुणे : पुणे जिल्ह्यामधल्या खरपुडीतल्या भीमा नदीवरील पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात एक तरूण वाहून गेला आहे. आझाद नारायण गाडे असं या तरुणाचं नाव असून तो खरपुडी गावचा रहिवासी आहे. आझादने दारूच्या नशेत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यात पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानाही तो पार करण्याचा प्रयत्न आझादनं केला. ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिकमध्ये मालेगावच्या गिरणा नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यांच्या अरुंद भिंतीवरून काही उत्साही तरुण जीव धोक्यात घालून दुचाकी चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं गिरणा नदीचं पाणी मालेगावात दाखल झालं आहे. याच ठिकाणी असलेला कोल्हापूर टाईप के टी वेअर बंधारा ओसंडून वाहत आहे. धरणाच्या अरुंद भिंतीवर रहदारीला मनाई असल्याचं लिहिलं आहे. मात्र तरीही नागरिक या बंधाऱ्यावर बिनधास्तपणे फिरत असतात.
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या सांडव्याजवळच्या पुलावर काही तरूण पाण्याशी खेळण्याचं वेड धाडस करत असतानाचा व्हि़डिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन जण सेल्फी काढण्यात मग्न असल्याचं दिसून आलं. तर दुसरे दोघेजण पुलाच्या कठड्याजवळ उभं राहून उडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात हात घालण्याचा प्रयत्न करत होते.
काही महिलांनी या तरूणांना रोखण्याचाही प्रयत्न केला. पण या गटातल्या अतिहौशी लोकांपुढं त्यांचं काहीच चाललं नाही. हा सारा प्रकार जीवघेणा असून, असे प्रकार टाळणंच योग्य. अन्यथा नाहक जीव गमावला जाण्याची दाट भीती आहे.