वसई-भाईंदर रो-रोमध्ये हुल्लडबाजी, तरुणांची समुद्रात दारू पार्टी

Ro Ro service Viral Video: रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी, टेबल खुर्च्या टाकून समुद्रात पार्टी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप

Updated: Mar 24, 2024, 12:07 PM IST
वसई-भाईंदर रो-रोमध्ये हुल्लडबाजी, तरुणांची समुद्रात दारू पार्टी title=
youth doing party in vasai-bhynder Ro Ro service video viral on social media

Ro Ro service Viral Video: मीरा- भाईंदर आणि वसई या दोन शहरांतील अंतर कमी करण्यासाठी समुद्रात रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, रो-रो सेवा सुरू झाल्यापासून वादात सापडली आहे. उद्घाटन झाल्यानंतर काहीच दिवसांत रोरो जेट्टीला धडकून अपघात झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रो-रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हुल्लडबाज तरुण दारू पार्टी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही रोरो सेवा आहे की पार्टीचा अड्डा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाईंदर ते वसई दरम्यान आरोही नावाची रोरो बोट सुरू करण्यात आली आहे. याच बोटीत 8 ते 10 जण टेबल व खुर्च्या टाकून दारू पार्टी करत असल्याचे दिसत आहे. तसंच, मनोरंजनासाठी भोजपुरी गाणीदेखील वाजवली जात आहेत. त्यामुळं नागरिकांचा संताप होत आहे. यामुळे ही ही रो रो सेवा आहे की पार्टीचा अड्डा असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.

व्हिडिओ मध्ये दिसणारी ही मंडळी मीरा-भाईंदर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारावरून सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

रो-रो सेवेमुळं प्रवास 15 मिनिटांवर

भाईंदरहून वसईला रस्ते मार्गे जायचे असेल तर आता एक ते सवा तासाचा कालवधी लागत होता. मात्र रो-रो सेवेमुळं प्रवासाचा वेळ वाचतोय. आता तुम्हाला 15 मिनिटांत हे अंतर पार करता येते. या रो रो बोटमध्ये 50 दुचाकी आणि 30 चारचाकी वाहन क्षमता असणार आहे. त्याचबरोबर प्रवासी क्षमता 100 पेक्षा जास्त असणार आहे. या रो रो बोटची किंमत 6.2 कोटी रुपये आहे. वसई ते भाईंदर हे रस्त्याचे सरासरी अंतर 38.20 किलोमीटर आहे. मात्र आता जलद मार्गाने हे अंतर केवळ  3.57 किलोमीटर असेल. वसई आणि भाईंदर सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत रोरो बोट सेवा नागरिकांना उपलब्ध असेल. जेट्टीजवळ प्रवाशांसाठी वेटिंग रूम, टॉयलेट आणि तिकीट बुकिंग काउंटर उभारण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांना नाश्ता करण्यासाठी कॅफेटेरिया उपलब्ध असेल.