अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात एका आंदोलनाची पंचविशी साजरी झाली. ऐकायला जरा वेगळं वाटत असेल. पण हे खरयं. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खासदार संजय काकडे यांच्या विरोधात न्यू कोपरे गावच्या प्रकल्पग्रस्तांनी सत्याग्रह पुकारलाय. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी काकडेंच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत सलग २५ व्यांदा स्वतःला अटक करून घेतली.
'आज आहे सोमवार, संजय नाना नमस्कार', 'घर द्या घर द्या, संजय काकडे घर द्या' गेले २५ आठवडे या घोषणा संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर घुमताहेत.
नॅशनल डिफेन्स अकॅडेमीसाठी विस्थापित व्हाव्या लागलेल्या ग्रामस्थांचा हा लढा आहे. काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आला. मात्र, या पुनर्वसनामध्ये कोपरे गावातील काही लोकांना घरं मिळाली नसल्याची तक्रार आहे.
खासदार संजय काकडे आणि प्रशासनानं मिळून पात्रताधारक रहिवाश्यांवर अन्याय केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. युक्रांदच्या माध्यमातून त्याविरोधात गेले ६ महिने आंदोलन सुरु आहे.
संजय काकडेंना मात्र या मागण्या मान्य नाहीयेत. तक्रारदारांनी त्यांचा हक्क कायदेशीर मार्गानं सिद्ध केल्यास त्यांना त्यांची घरं देण्यास आपण बांधील असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याप्रमाणे हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.
प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी अशा प्रकारचं आंदोलन होतं. ठराविक काळ निदर्शनं केल्यानंतर पोलीस आंदोलनकर्त्यांना अटक करून घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये नाव नोंदणी झाली की सुटका असा हा नित्यक्रम आहे.
आजचं (सोमवार) आंदोलन हा रौप्यमहोत्सवी सत्याग्रह होता. यापुढच्या काळात काकडेंच्या कार्यालयासमोर न बसता जनतेच्या दरबारात हा प्रश्न नेणार असल्याचं डॉ सप्तर्षींनी म्हटलयं.