औरंगाबाद: काही दिवसांपूर्वीच गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सर्व पिके पाण्याखाली गेली होती. तसेच काही पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसून ते खराब झाले होते. परंतु या मुसळधार पावसाच्या तडाख्यातून शेतकरी राजा सावरत नाही तोवर आज पहाटेपासून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व काही नष्ट झालं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहर, कन्नड, हर्सुल, गंगापूर, सोयगाव, वैजापूर, सिल्लोड परिसरात आज पहाटे 2 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत तुफान अतिवृष्टी झाली. आधीच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीला पुन्हा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांनी होते नव्हते ते सर्व गमावल्याचे चित्र दिसत आहे.
मराठवाड्यातील शेतकरी एकेकाळी दुष्काळामुळे मेटाकूटीला आला होता तर आता अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. पिकांना पावसाचा तडाखा बसल्याने आता शेतकऱ्यांनी करायचे काय? पोटाची खळगी भरण्यासाठी उत्पन्न आणायचे कुठून असा सवाल उपस्थित होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरले आहेत. शेतकऱ्यांच्या शेताचे तळे झाले आहे. अनेकांची शेतजमीन उकरली गेली आहे. आज पहाटे झालेला पाऊस प्रचंड मेघगर्जनेसह बरसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.