गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

संबंधितांनी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिले होते.

Updated: Aug 24, 2018, 04:34 PM IST
गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे शुक्रवारी पोलिसांनी नरबळी देण्याचा प्रयत्न उधळून लावला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) कार्य़कर्ते आणि बडोद बाजार पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पूजा सुरु होण्यापूर्वीच पोलीस याठिकाणी पोहोचले आणि संबंधितांना ताब्यात घेतले. इमाम पठाण, बाळू शिंदे यांच्यासह आणखी एकाला यावेळी ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तधन मिळवण्यासाठी हा विधी होणार होता. यासाठी संबंधितांनी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिले होते. पोलीस याठिकाणी पोहोचले तेव्हा काहीजण नग्नावस्थेत पूजेच्या विधींची तयारी करत होते. या विधींसाठी एका लहान मुलीचा बळीही देण्यात येणार होता. मात्र, सुदैवाने पोलीस याठिकाणी पोहोचले आणि अनर्थ टळला. 

सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यासाठी संबंधितांची कसून चौकशी सुरु आहे.