सागर कुलकर्णी, देगलूर : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष दररोज दिसत आहे. आता देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा भाजपात प्रवेश करत शिवसेनेला धक्का देत काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचा भाजपाने ठरवले आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेत शिवसेनेचा शिवबंध सोडत भाजपचं कमळ हातात घेण्याचं जवळपास निश्चित केले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यासह नांदेड चे खासदार प्रताप चिखलीकर नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे देगलूरचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी फडणवीस यांची भेट घेतली साबणे यांनी भाजपात प्रवेश करत असल्याचं 'झी मीडिया'ला सांगितले. 'झी मीडिया'शी बोलताना सुभाष साबणे यांनी नांदेड ते पालक मंत्री अशोक चव्हाण यांची कार्यपद्धती एकाधिकारशाहीची असल्याची टीका त्यांनी केली
देगलूर विधानसभेत विकास निधी शिवसेनेने आणायचा आणि त्याचे श्रेय पालक मंत्री अशोक चव्हाण घेत आहेत. शिवसैनिकांना आपल्या अधिकाराचा वापर करत चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक वेळा त्रास दिला आहे. यामुळे आपण अशोक चव्हाण यांच्या विरोधात कठोर भूमिका घेणार असून पुढील काळात भाजपात प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
काय आहे देगलूर विधानसभा पोटनिवडणूक तिचे राजकीय समीकरण
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेत विद्यमान काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंत्रापूरकर यांचे कोरोना कालावधीत निधन झाले. त्यामुळे देगलूर मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसचे नेते आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे प्राबल्य या विधानसभा क्षेत्रात अधिक आहे. यामुळे काँग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे.
भाजपाने या पोटनिवडणुकीत यापूर्वी याच विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा निवडणूक जिंकलेले सुभाष साबणे यांनाच भाजपात प्रवेश करत उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. अशोक चव्हाण यांना लोकसभेमध्ये प्रताप चिखलीकर भाजपाकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा प्रभाव हळूहळू कमी झाला आहे.
आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देगलूर विधानसभेसाठी भाजपाचा उमेदवार देणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजप विजय मिळवला तर अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठी राजकीय नामुष्की ठरू शकते.
काँग्रेसच्यावतीने अंंत्रापूरकर यांच्या मुलाला जितेश रावसाहेब अंत्रापूरकर तिकीट देण्याचं जवळपास निश्चित झाले असल्याचं समजतंय. यामुळे भविष्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना देगलूर पोटनिवडणूकीत दिसणार आहे.