बीड: धावत्या रेल्वेगाडीत स्टंट करणे धोक्याचे आहे, हे सांगण्याची गरज नसते. मात्र, तरीही काही माथेफिरु धावत्या रेल्वेत स्टंट करुन हकनाक आपला जीव धोक्यात घालतात. नांदेड-बेंगलोर रेल्वे गाडीत नेमका असाच प्रकार घडला. या वेगानं धावत्या गाडीत एक तरुण अक्षरशः रेल्वे बाहेर लटकत होता. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील तो युवक असून प्रकाश हरिभाऊ खरात (वय 26) असे त्या युवकाचे नाव असून, तो बूट पॉलिशचा व्यवसाय करतो.
परळीकडे येणाऱ्या नांदेड-बेंगलोर रेल्वे गाडीत खिडकीला लटकून तो हा जीवघेणा स्टंट करत होता. यावेळी त्याचा हात सटकल्याने तो खाली पडला. मात्र, प्रवासी आणि रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे वेळीच उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना १२ जुलैच्या संध्याकाळी पानगाव ते घटनांदून दरम्यान असलेल्या चोपनवाडी शिवारातली आहे. प्रकाशला दुर्घटनेनंतर स्थानिकांनी अंबाजोगाई येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या उपचार करून सोडण्यात आले. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो जिवंत राहिला नाहीतर अशा स्टंटमध्ये अनेकांचे जीव गेलेत.