शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक नेते पक्ष सोडून जात असताना पक्षाचे आधारस्तंभ असलेले शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून लातूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मेळावा घेतला. यावेळी लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यभरात महाजनादेश यात्रा घेऊन फिरत आहेत. यामध्ये ते सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकी भाषण फक्त शरद पवारांवर करतात. कारण यांना स्वप्नातही मीच दिसतो. त्यामुळे ते शरद पवार म्हणून घोकत असतात, अशी कोपरखळी त्यांनी यावेळी लगावली.
गड किल्ल्यावर दारू दुकाने थाटण्याची परवानगी सरकारने दिली. आता उद्या छ्मछमही आणतील. हा शिवबाचा महाराष्ट्र असूच शकत नाही. त्यामुळे शौर्य आणि स्वाभिमानाच्या इतिहासाला धक्का लावणाऱ्या या सरकारला खाली खेचण्याचे आवाहन ही शरद पवार यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
मी अजून म्हातारा झालेलो नाही, अनेकांना घरी पाठवायचे आहे. जे गेलेत त्यांची नावे काढू नका. जो मावळणार आहे त्याची चर्चा कशाला करायची? इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्याच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली. लाचारी स्वीकारणाऱ्या या नेत्यांना लोक जागा दाखवतील, असे म्हणत पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली.