मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ( SANJAY RAUT ) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या ( KIRIT SOMAIYA ) यांच्या पत्नी मेधा सोमय्या ( MEDHA SOMAIYA ) यांनी युवक प्रतिष्ठानच्या ( YUVAK PRATISTHAN ) माध्यमातून १०० कोटीचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
संजय राऊत यांनी यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. या घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या यांची चौकशीही झाली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे.
मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटींची अवमान याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात माहिती देताना सोमय्या म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते आहेत. आता त्यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरू करावी.
महाराष्ट्रात माफिया राज सुरू आहे. या माफियाराजची दहशत माजली आहे. संजय राऊत यांनी जे आरोप केले त्यांबद्दल त्यांनी आधी माफी मागावी. उद्धव ठाकरे यांच्या माफिया राजला धडा शिकवण्यासाठी 100 कोटींची अवमान याचिका मेधा सोमय्या यांनी केली आहे. जून महिन्यात या प्रकरणाची सुनावणी होईल असे त्यांनी सांगितले.