धारावीत कोरोनाचा धोका वाढला; आणखी २० जणांना लागण

संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे.

Updated: Apr 19, 2020, 07:22 PM IST
धारावीत कोरोनाचा धोका वाढला; आणखी २० जणांना लागण title=

मुंबई: शहरातील सर्वात दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावीत कोरोनाचे (Coronavirus) संकट आणखी गडद झाले आहे. संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. अशातच रविवारी धारावीत कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळून आल्याने या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. 

त्यामुळे आता धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३८ वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत धारावीतील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या २० नव्या रुग्णांमध्ये फातिमा चाळीतील सहा जणांचा समावेश आहे. यापूर्वी शनिवारी कल्याणवाडीमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता धारावी परिसरातच कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तयार होत असल्याची भीती आहे. 

Coronavirus: मुंबईच्या आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर

प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. या भागातील संसर्ग कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.  मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. 

कोरोनामुळे दुरावलेल्या मायलेकींची २१ दिवसांनी भेट

 

माहिममध्ये कोरोनाचे ४ नवे रुग्ण
मुंबईच्या जी नॉर्थ या वॉर्डमध्ये येणाऱ्या माहिममध्येही रविवारी कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळून आले. हे सर्वजण न्यू पोलीस कॉलनीतील रहिवासी आहेत. कोरोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबलच्या संपर्कात आल्यामुळे या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यामुळे आता माहिम परिसरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १४ इतका झाला आहे.