राज्यातील कोरोनाचा सर्वात लहान रुग्ण; तीन वर्षांच्या मुलीची टेस्ट पॉझिटिव्ह

ही मुलगी नुकतीच आपल्या आईवडिलांसह अमेरिकेहून परतली होती.

Updated: Mar 16, 2020, 08:22 PM IST
राज्यातील कोरोनाचा सर्वात लहान रुग्ण; तीन वर्षांच्या मुलीची टेस्ट पॉझिटिव्ह title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच चिंतेत भर टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. कल्याण शहरातील एका तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. ही मुलगी राज्यातील सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण ठरली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी नुकतीच आपल्या आईवडिलांसह अमेरिकेहून परतली होती. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या तिघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान यापूर्वीच झाले होते. यानंतर आज मुलीचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 

CoronaVirus : पुण्यातील दुकानं ३ दिवस बंद

गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राज्यभरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले. यापैकी यवताळमध्ये एक, मुंबईत तीन आणि नवी मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ग्रामीण भागातील शाळा बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आगामी १५ दिवस राज्याच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नागरिकांना स्वयंशिस्त पाळल्यास शहर बंद ठेवण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.