मुंबई : मुंबईत चिंचपोकळीच्या चिंतामणीचा काल आगमन सोहळा होता. या आगमन सोहळ्याला एवढी गर्दी होईल, याचा अंदाज ना पोलिसांनी होता, ना गणेश मंडळाला. पण या गर्दीत चोरांनी आपली जत्रा केलीय. तब्बल पन्नासहून अधिक मोबाईल्स चोरट्यांनी लंपास केलेत.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा सोहळ्यासाठी काल लालबाग आणि चिंचपोकळीत प्रचंड गर्दी झाली. चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाचं हे शंभरावं वर्ष असल्याने सर्वांनाच या विषयी आकर्षण होतं. नजर पडेल तिकडे तरूणाईचा सागर दिसत होता.
सोहळ्याला एवढी गर्दी होईल, ही अपेक्षा मंडळालाही नव्हती. या गर्दीत चोरट्यांनी ५० पेक्षा जास्त मोबाईल लंपास केले आहेत, आणि अजूनही तक्रारी येताय असे तक्रार दाखल करणारे म्हणताय. किती मोबाईल चोरांनी लंपास केले ? याबद्दल पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया याबाबत दिलेली नाही
२ युवतींचा गर्दीत श्वास कोंडला गेला होता. त्यामुळे अत्यवस्थ झाल्याने त्यांना केईएम रूग्णालयात नेण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. तसेच एक तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार होती. मात्र काही तासानंतर या तरूणीचा शोध लागला.
शंभरावं वर्ष असल्याने चिंचपोकळीचा चिंतामणीच्या सोहळ्याला अलोट गर्दी झाल्याचं मंडळाने म्हटलंय, तर दुसरीकडे मंडळाने पूरग्रस्तांसाठी ५ लाख रूपयांची मदत दिल्याचं सांगितलंय. मात्र चिंचपोकळीचा चिंतामणीला तरूणाईची मोठी पसंती असल्याचं दिसून येत आहे. मात्र संपूर्ण प्रकरणात मंडळाने प्रतिक्रिया दिलेली नाही.