आधार कार्ड असेल तरच १० रुपयांत जेवण मिळणार

सुरुवातीला राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु करण्यात येणार आहे.

Updated: Jan 22, 2020, 11:40 AM IST
आधार कार्ड असेल तरच १० रुपयांत जेवण मिळणार

मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या १० रुपयात थाळीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज पडणार आहे. तसेच ही थाळी खाणार्‍यांचा फोटोही काढला जाणार आहे. समाजातील गरीब वर्गासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यात ही योजना सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ ठिकाणांचा समावेश असेल. १० रुपयात थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून शहरी भागात ३५ रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. 

पण ही योजना राबवताना बोगस लाभार्थी दाखवले जाऊ नयेत यासाठी राज्य सरकारकडून आधार कार्ड आणि फोटो काढण्याची अट टाकण्यात आली आहे. यापूर्वी युती सरकार असताना शिवसेनेच्या संकल्पनेतून १ रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आली होती. शिवसेनेच्या संकल्पनेतूनच १० रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे.

सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, ही योजना गरिबांना केंद्रस्थानी ठेवून सुरु करण्यात आली आहे. योग्य व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच थाळी मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवण्याची अट घालण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सुरुवातीला राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु करण्यात येणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेचा विस्तार केला जाईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.