close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीमागे मोदींचा हात असल्याचा अबू आझमींचा आरोप

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

Updated: Jun 26, 2019, 09:08 PM IST
टीम इंडियाच्या भगव्या जर्सीमागे मोदींचा हात असल्याचा अबू आझमींचा आरोप

मुंबई : टीम इंडियाच्या जर्सी प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे. टीम इंडियाच्या भगव्या जर्सीमागे मोदींचा हात आहे. टीम इंडियाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत, असा आरोप आझमी यांनी केला आहे.

काय म्हणाले आझमी ?

'टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ही कामागिरी प्रशंसनीय आहे. परंतु मोदी सरकार हे देशाला भगवा करण्याच्या प्रयत्नात आहे. देशात विकासकामे झालेली नाहीत,  बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. महागाईचा दर आणि डॉलरची किमंत वाढत आहे, असे असताना देखील जनतेने मोदींना निवडून दिलं, याबाबतीत आझमी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 

'आपल्या भारताच्या झेंड्याला एका मुस्लिमाने रंग दिला आहे, हे विसरु नये. त्यामुळे टीमला रंग द्यायचाच असेल तर तिंरग्याचा द्या. जर्सीला भगवा रंग देणं अयोग्य आहे. या प्रकाराचा जनतेने विरोध करायला हवा', असे आझमी म्हणाले.  

अबू आझमींना प्रत्युत्तर

अबू आझमींनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपावर शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. टीम इंडियाच्या जर्सीवरुन विनाकारण राजकारण केलं जातं आहे. तिरंग्यातील हिरवा रंग नको, याविषयी बोललो का ? असा प्रश्न त्यांनी केला.

टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये भगव्या जर्सीत खेळताना दिसणार असल्याचे आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या जर्सीत साम्य आहे. त्यामुळे दोन्ही टीम ओळखण्यास अडचण येऊ नये यासाठी आयसीसीने बीसीसीआयला जर्सीचे रंग बदलण्याचे आदेश दिले  असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही जर्सी भगव्या रंगाचीच असेल का, याबाबत कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.  

नियम काय म्हणतो ?

जर्सीबाबतही आयसीसीचे काही नियम आहेत. टीम इंडिया आणि इंग्लंड टीमची जर्सी जवळपास एका सारखीच आहे. आयसीसीच्या नियमानुसार एकाच मॅचमध्ये दोन टीमला रंगाने काहीसी सारखी असणारी जर्सी घालता येत नाही. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआयला टीम इंडियाच्या जर्सीचा रंग बदलण्याचे आदेश दिले होते.

टीम इंडियानेच का बदलावा रंग ?

 टीम इंडिया आणि इंग्लंड टीमच्या जर्सी जवळपास सारखी आहे. मग टीम इंडियालाच जर्सीचा रंग बदलण्यासाठी का सांगितलं, असा सवाल काही चाहत्यांकडून केला जात आहे. आयसीसीच्या नियमांनुसार यजमान टीमला यामधून सवलत दिली जाते. सध्याच्या वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे. मात्र टीम इंडियाला भगव्या रंगाची जर्सी देण्यात येणार आहे किवा नाही हे अजून स्प्ष्ट झालेलं नाही. 

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ३० जूनला मॅच खेळली जाणार आहे.