मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील नागरिकांना वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी गैरसोय असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्याची तातडीनं दखल घेतली आणि या लोकांना दुसरीकडे हलवले.
स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. लोकांची गैरसोय होण्यात जी व्यक्ती जबाबदारी होती, त्या व्यक्तिवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी व्हिडिओ पाठवले होते त्यांच्याशी आपण स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तिच्या वतीनं माफी देखिल मागितली, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भविष्यात कधी गरज लागली तर संपर्क साधता यावा म्हणून त्यांना आपला संपर्क नंबरही दिल्याचं आदित्य यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
वरळी पोद्दार हॉस्पिटल मधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काल जी गैरसोय झाली होती आणि त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 6, 2020
ह्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले आहे. मला त्यांनी नवीन व्हिडिओज पाठवले आहेत. मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्या वतीने माफी देखील मागितली. त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी मी त्यांना माझा संपर्क क्रमांक दिला आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 6, 2020
आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात महापालिकेच्या जी दक्षिण प्रभाग येतो. या प्रभागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेषतः वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे त्यांच्या जवळच्या रहिवाशांना वरळीच्या पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं होतं. पण या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि गैरसोय असल्याचा व्हिडिओ संबंधितांनी पाठवला होता आणि तो व्हायरलही झाला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना त्याची दखल घेत मतदारसंघातील या लोकांची व्यवस्था अन्य ठिकाणी केली.
महापौर किशोरी पेडणेकर यादेखिल या मतदारसंघातीलच असून त्यांनीही स्वतः लक्ष घालून या भागातील लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.