Air India Building Sold: एअर इंडियाची नरीमन पॉइंट इथली इमारतीचा करार अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीची किंमत 1600 कोटी इतकी असून राज्य सरकार याची खरेदी करणार आहे. एअर इंडिया इमारत खरेदीच्या निर्णयावर राज्य सरकारच्या मंत्रिंमडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नरीमन पॉइंट या मोक्याच्या ठिकाणी ही 23 मजली इमारत आहे. दरम्यान राज्य सरकारने 1600 कोटी मोजण्याइतके या इमारतीत काय खास आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. सुरूवातीला या इमारतीसाठी 1450 कोटींची बोली लावण्यात आली होती. एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेड कंपनीने हा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून 1600 कोटींची बोली लावण्यात आली. ही बोली अंतिम ठरली. केंद्राच्या मान्यतेनंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही इमारत खरेदी करण्याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नरिमन पॉइंट येथील मंत्रालयाजवळ ही आलिशान इमारत बदलत्या मुंबईची ओळख म्हणून उभी आहे. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातही ही इमारत दहशतवाद्यांचे लक्ष्य बनली होती. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता. 2021 मध्ये एअर इंडिया इमारत खरेदीची प्रक्रिया सुरु झाली होती पण करार ठरला नव्हता. मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश होता.
खरेदी सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात सत्तापरिवर्तन झाले आणि सौदा पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले. या सरकारने पुन्हा एकदा खरेदी प्रक्रिया पुढे नेली होती. दरम्यान राज्यात पुन्हा सत्ताबदल झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार आले. या काळात आता इमारत खरेदीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.