अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा', भावाच्या अधिकारानं सुप्रियाताईंनाही दटावलं

अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा' आहेत. भावूक नेत्यांना त्यांनी  दम भरला तसेच भावाच्या अधिकारानं सुप्रियाताईंनाही त्यांनी दटावलं आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 2, 2023, 11:00 PM IST
अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा', भावाच्या अधिकारानं सुप्रियाताईंनाही दटावलं title=

Sharad Pawar resigns as NCP chief : ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशीत झाला. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची  घोषणा केली आहे. कार्यक्रमानंतर  शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit Pawar) तातडीनं सक्रीय झाले. नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्यासाठी  त्यांनी पुढाकार घेतला. एवढंच नव्हे तर मोठा भाऊ या नात्यानं सुप्रिया सुळेंना अधिकारवाणीनं दटावलं.

भावूक नेत्यांना भरला दम

पवार राजकारणात थांबणार असतील, तर आम्ही थांबू नाही तर पक्ष ज्याला चालवायचा त्याला चालवू दे, असं जयंत पाटलांनी म्हटलं.... पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बोलताना जयंत पाटलांना अक्षरशः रडू कोसळलं.  शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राष्ट्रवादीवर आभाळ कोसळले. जयंत पाटलांपासून अनेक नेत्यांना रडू आवरेना. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. तेव्हा अजित पवार तत्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. भावनिक होऊ नका, असा सल्ला त्यांनी सगळ्यांना दिला.

अजित पवार कडाडले

शरद पवारांचं मन वळवावं, यासाठी काही राष्ट्रवादी कार्यकर्ते सुप्रिया सुळेंना आग्रह करत होते. तेव्हा अजित पवार कडाडले. मोठ्या भावाच्या नात्यानं त्यांनी अधिकारवाणीनं दटावले.  पवारांचं मन वळवा असा आग्रह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंना करत होते. सभागृहात वेगवेगळ्या लोकांनी बोलावं यासाठी सुप्रिया सुळे आग्रही होत्या तर सभागृहात विनाकारण लोकांनी बोलू नये अशी अजित पवारांची इच्छा होती. काही कार्यकर्ते सुप्रिया सुळेंकडे बोलू द्यायची विनंती करायला लागले. त्याचवेळी अजित पवार कडाडले. सुप्रिया तू बोलू नको, अशा शब्दात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना खुणावलं. मोठ्या भावाच्या नात्यानं अधिकारवाणीनं सांगतोय.. असं अजितदादांनी कार्यकर्त्यांकडे पाहून म्हटलं.

बाकीचे नेते शरद पवारांना निर्णय बदलण्यासाठी विनंती करत होते. याउलट अजितदादांनी मात्र या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. पवारांच्या निर्णयाची पूर्वकल्पना अजित पवारांना होती, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांचाही अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी अधिकारवाणीनं, हक्कानं आणि प्रेमानं समजावलं. पवारांच्या नंतर राष्ट्रवादीत तेच दादा असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आले.