मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्याबाबत मोठा खुलासा केला. ते 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये हे सरकार कोसळले होते. या निर्णयाबाबत त्यांना विचारणा केली असता फडणवीस यांनी म्हटले की, त्यावेळी अजित पवार यांनी आपण शरद पवार यांच्याशी भाजपसोबत जाण्यासंदर्भात चर्चा केल्याचे आम्हाला सांगितले होते. शिवसेना आणि काँग्रेससोबत आम्ही सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करू. मी या गोष्टीची कल्पना शरद पवार यांना दिली आहे, असा दावा त्यावेळी अजित पवारांनी केल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सरकार स्थापनेचा निर्णय योग्य किंवा अयोग्य होता, हे मी वेळ आल्यावर सांगेन, असेही फडणवीस यांनी म्हटले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. मात्र, ऐनवेळी आमदारांनी साथ सोडल्याने अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. परंतु, सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांशी माझे बोलणे करून दिले होते, असा दावा फडणवीस यांनी मुलाखतीदरम्यान केला. मात्र, सरकार स्थापनेच्या रात्री नेमके काय घडले, हे मी योग्य वेळ आल्यावरच सांगेन. या सगळ्या प्रक्रियेत भाजपने कोणाशीही डील केली नाही. आम्हाला डील करायचीच असती तर आम्ही अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युलासाठी राजी झालो असतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.
तसेच महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्रसारमाध्यमांकडून भाजप हरलाय, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही ७० टक्के मते मिळवली आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, ४४ टक्के मते मिळवणाऱ्यांनी एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.