मुंबई : मुंबईत जोरदार पाऊस सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्र्यांमुळे विरोधकांपुढे नमतं घ्यावं लागलं. सकाळी मुंबईत अतिवृष्टी नसल्यानं शाळांना सुट्टी देण्याची गरज नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी सांगून टाकलं. पण प्रत्यक्षात स्थिती वेगळीच होती मुंबईत अतिवृष्टी झाल्याचं मुख्यमंत्र्यानी विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या मुंबईतल्या पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देतना कबुल केलं. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी पुन्हा एकदा आढावा घेऊन हवं तिथे सुट्टी जाहीर करावी असं मुख्यमंत्र्यांनीचं विधानसभेत सांगितल्यावर तावडेंना सुट्टी जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नाही. आणि मग मुख्याध्यापकांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी द्यावी अशी घोषणा तावडेंनी केली. त्याआधी अजित पवारांनी मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा सरकारला दिला.
मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा संतताधार सुरू आहे. रस्ते ,रेल्वे, शाळा...म्हणाल तिकडे पाणीच पाणी आहे. तिन्ही मार्गावरची लोकलसेवा अतिशय धिम्या गतीनं सुरू आहे. विरार-बोरीवली सेवा सकाळपासून ठप्पच आहे. मध्यरेल्वेची वाहतूकही तब्बल किमान अर्धातास उशिरानं सुरू आहेत. सायन- माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आलंय. त्यामुळे लोकल वाहतूक अतिशय मंद गतीनं सुरू आहे. गेल्या तास-दीड तासात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यानं सखल भागात पाण्याची पातळी वाढतेय. त्यामुळे पश्चिम दृतगती मार्गावरही ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे.