अजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री ठरेना

गुरुवारी शपथ घेणाऱ्यांमध्ये कोण कोण असतील? याची उत्सुकता कायम आहे 

Updated: Nov 27, 2019, 11:00 PM IST
अजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री ठरेना

मुंबई : गुरुवारी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडून शिक्कामोर्तब झालं असलं तरी उपमुख्यमंत्रीपदाचा घोळ मात्र अद्याप कायम असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे एव्हाना स्पष्ट झालं असलं तरी हा उपमुख्यमंत्री कोण असेल? हे कोडं मात्र अद्याप सुटलेलं नाही.

p>उपमुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून हे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.  

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं. आज वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकासआघाडीच्या सत्तावाटपाची बैठक झाली. असं असलं तरी उपमुख्यमंत्री कोण असेल, याचं उत्तर पटेलांनी दिलं नाही. दुसरीकडे उद्या उद्धव ठाकरे यांच्याखेरीज प्रत्येक पक्षाचे दोन, असा सात जण शपथ घेतील, असं पटेल यांनी स्पष्ट केलं. ३ तापरखेपूर्वी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असंही ते म्हणाले. 

उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या  मंत्रिमंडळातील सहाजणांचाही उद्याच शिवतीर्थावर शपथविधी होणार आहे. यात शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश असणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ३ डिसेंबरला होणार आहे. उद्या शपथ घेणाऱ्यांमध्ये कोण कोण असतील? याची उत्सुकता निर्माण झालीय.