अजित पवार यांच्या अमित शाहांना शुभेच्छा, अनेकांच्या भुवया उंचावल्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

Updated: Oct 22, 2020, 10:36 PM IST
अजित पवार यांच्या अमित शाहांना शुभेच्छा, अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवारांनी ट्विटरवरून शाहा यांचे अभिष्टचिंतन केले आहे. अजित पवार यांनी अमित शाहांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित होते. मात्र, ही बैठक संपल्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी अमित शाहांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

गेल्या महिन्यातही अजित पवारांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तानं ट्विटरवरून अभिवादन केले होते. मात्र काही मिनिटांतच हे ट्विट त्यांनी डीलीट केले होते. आता त्यांनी अमित शाहांना शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा राजकीय विश्वातील चर्चेला रंग आला आहे. 

दरम्यान, अजित पवार यांची प्रकृती चांगली आहे. मात्र त्यांना सर्दी असल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी सकाळी बोलणे झाले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्रालयात अजित पवारांच्या दालनात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक सुरु असताना अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत राजकीय विषयावर चर्चा असल्याची माहिती आहे.