मुंबई : मुंबईत भविष्यात येणाऱ्या सर्व लोकल एसीच असणार आहेत. एमयुटीपी 3 प्रकल्पाअंतर्गत मुंबईत सर्व एसी लोकलच मुंबईत येणार आहेत. याचाच अर्थ मुंबईत भविष्यात एसी लोकलचंच युग असणार आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी ही माहिती दिलीय.
मुंबईमध्ये आज पहिली एसी लोकल धावली. सकाळी साडे दहा वाजता बोरीवलीहून चर्चगेटला ही लोकल रवाना झाली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
उद्घाटनाच्या लोकलमध्ये मोजकेच सामान्य प्रवासी होते. पत्रकार आणि वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांसाठी एक वेगळा डबा देण्यात आला होता. सुटीचा दिवस असल्यानं स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती. लोकलचे ऑटोमॅटिक दरवाजे, मोठ-मोठ्या खिडक्या आणि फुलांची सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.