चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : अंबरनाथच्या (Ambarnath Crime) एका सराईत गुन्हेगाराने पत्रकारावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पोलिसांसमोरच (Ambarnath Police) पत्रकारावर दगडाने हल्ला केला. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका वर्षासाठी जेलमध्ये स्थानबद्ध करण्यासाठी नेत असतानाच सराईत आरोपीने हे धक्कादायक कृत्य केले आहे. जितेंद्र पवार असे या आरोपीचे नाव आहे. जितेंद्र पवार या कुख्यात गुन्हेगाराने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला दगड फेकून मारला आहे.
कुख्यात आरोपी जितेंद्र पवार याला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याने एका वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे त्याला कारागृहमध्ये हलवण्यात येत होते. आरोपी जितेंद्रवर एम.पी.डी.ए ची कारवाई करून त्याला जेलमध्ये पाठवण्यात येत होते. मात्र त्याचवेळी त्याचे चित्रीकरण करण्यासाठी काही पत्रकार जमले होते. त्यानंतर पोलीस आरोपीला गाडीत बसवण्यासाठी नेत असताना आरोपीच्या भावाने त्याला दगड आणून दिला. रागात आरोपी जितेंद्र पवारने तो दगड पत्रकारांच्या दिशेने भिरकावला. यावेळी त्याने पत्रकारांना शिवीगाळ देखील केली. मात्र पोलिसांनी यात फक्त बघ्याची भूमीका घेतल्याने पोलिसांवर टीका होत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
अंबरनाथमध्ये मोठी घटना! पोलिसांसमोरच आरोपीची पत्रकाराला दगडाने मारहाण; पाहा व्हिडिओ
#Ambernath #stoned #journalist #marathinews #zee24taas pic.twitter.com/ny8zPrxD0H— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2023
चाकूने भोकसून शेजाऱ्याची हत्या
रविवारी मुंबईतील मुलुंडच्या पूर्व उपनगरात एका 33 वर्षीय व्यक्तीची त्याच्याच शेजाऱ्याने चाकूने भोसकून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलुंडमधील सिद्धार्थ नगर भागातील नागरी बाजाराजवळील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) इमारतीत ही घटना पहाटे घडली. मुकेश शेट्टी असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्याच्या 21 वर्षीय शेजाऱ्याने त्याच्यावर चाकूने वार केल्याचे माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत अटक करण्यात आली आहे
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झाले होते आणि आरोपीच्या मनात त्याचाच राग होता. दरम्यान, शनिवारी, एका बॉलीवूड अभिनेत्यासाठी ड्रायव्हर म्हणून काम करणार्या 53 वर्षीय व्यक्तीची मुंबईत 24 वर्षीय मुलाने कथितपणे हत्या केली होती. आरोपीला पीडित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा राग आला होता, असे पोलिसांनी सांगितले.