आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त

'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल... निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल...'

Updated: Jul 23, 2018, 10:32 AM IST
आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त title=

मुंबई: पंढरपूर येथे आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेला उपस्थित न राहण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या तीव्र असलेल्या भावना आणि त्यामुळे विठ्ठलपूजेला असलेला विरोध पाहता मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची पूजा सपत्नीक केली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या.

ट्विटमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री?

'आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले. दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥', अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल... निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल...', असा अभंगही त्यांनी पोस्ट केला आहे.

सर्वासामान्य दाम्पत्याला विठ्ठलपूजेचा मान

दरम्यान पंढरपुरात शासकीय पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचेही त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले.  मुख्यमंत्र्यांऐवजी विठ्ठलपुजेचा मान केणाला मिळणार याबाबत बरीच उत्सुकता होती. मात्र, हा मान हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्याला मिळाला. पंढरपुरात शासकीय पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आभार मानले. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.

जाधव दाम्पत्याचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

जाधव दाम्पत्याचे आभार मानताना, 'पंढरपूर, अवघ्या महाराष्ट्राचं माहेर... हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (तालुका-शेणगाव) सौ. वर्षाताई आणि श्री अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने आज माऊलीची शासकीय महापूजा केली, याचा मला विशेष आनंद आहे. या दाम्पत्याचे मन:पूर्वक अभिनंदन!' अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.