मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने (ED) आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई करु नये यासाठी अनिल देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांना दोनदा समन्स बजावलं होतं, पण प्रकृतीचं कारण पुढे करत अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते. अनिल देशमुख यांनी सात दिवसांची मुदत मागून घेतली होती, या मुदतीचा कालावधी सोमवारी संपत आहे. त्यामुळे ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात तिसरं समन्स बजावलं असून सोमवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता सोमवारी अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीला हजर होणार का हे, पहावं लागेल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे. ईडीने देशमुख यांच्या नागपूरसह मुंबईच्या घरी छापे टाकले होते. हा तपास तब्बल दहा तास चालला. काही कागदपत्रे पथकाने जप्त केले. कारवाईच्या वेळी अनिल देशमुख हे मुंबईत होते.
दरम्यान, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने येत्या 6 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका होती, असं संजीव पलांडे याने ईडीला दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे.