तब्बल साडेतेरा तासांनी ईडीची छापेमारी संपली, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

अनिल परब यांच्या मुंबईतल्या शासकीय आणि खासगी निवासस्थानवर ईडीची छापेमारी

Updated: May 26, 2022, 08:07 PM IST
तब्बल साडेतेरा तासांनी ईडीची छापेमारी संपली, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मुंबईतल्या शासकीय आणि खासगी निवासस्थानावरची ईडीने (ED) टाकलेली छापेमारी संपलीय... तब्बल साडेतेरा तास ही छापेमारी सुरू होती. तर दापोली आणि पुण्यातलं धाडसत्र 12 तासानंतरही सुरूच आहे. अनिल परब यांच्याविरोधात नवीन ईसीआयआर नोंदवण्यात आला असून, त्या आधारावर आज छापे टाकले गेले.

मुंबईत परबांच्या शासकीय निवासस्थानी तसंच खासगी घरावर, पुण्यात परब यांच्याशी संबंधित विभास साठे यांच्या घरी आणि दापोलीत परबांच्या रिसॉर्टवर हे छापे टाकण्यात आले. 

अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया
ईडीची आजची कारवाई संपल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थानावर, माझ्याशीसंबंधित लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवासांपासून बातम्या येत होत्या ईडीची कारवाई होणार अशा बातम्या येत होत्या.

दापोली इथं असलेलं साई रिसॉर्ट, याचे मालक सदानंद कदम आहेत त्यांनी मालकी हक्क सांगितला आहे. कोर्टातही त्यांनी दावा केला आहे. हे  रिसॉर्ट अजूनही सुरु झालेलं नाही, असं असताना पर्यावरणाची दोन कलमं लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्थानकात दाखल केला. 

जे रिसॉर्ट सुरुच नाही, प्रदुषण महामंडळानेही रिपोर्ट दिला आहे की हे रिसॉर्ट सुरु नाही. तरीही माझ्या नावाने नोटीस काढली गेली. तक्रार दाखल केली नाही. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने आज कारवाई केली, ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

या सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल, चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

आजची चौकशी ही फक्त रिसॉर्टसंदर्भात होती, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. मनी लॉन्ड्रींगचा काहीही संबंध नाही असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यांना जी कागदपत्र हवी होती ती दिली आहे, त्यांनी काहीही जप्त केलेलं नाही असंही अनिल परब यांनी सांगितलं.