'किरीट सोमय्या जगू देत नाहीत', अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीचा आरोप

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट

Updated: Feb 18, 2022, 06:01 PM IST
'किरीट सोमय्या जगू देत नाहीत', अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीचा आरोप title=

मुंबई : अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक (Akshata Naik) आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. किरीट सोमय्या यांच्याकडून आमच्या कुटुंबाची बदनामी होत असल्याची तक्रार अक्षता नाईक यांनी केली आहे. तसंच सोमय्या आम्हाला जगू देत नाही असा आरोपही नाईक कुटुंबाने केला आहे. नाईक कुटुंबियांनी गृहमंत्र्याकंडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. 

किरीट सोमय्या यांना जी माहिती हवी आहे ती  RTI अंतर्गत मिळू शकते, शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, जे काही व्यवहार झाले आहेत ते दोन एज्युकेटेड लोकांमध्ये झालेले आहेत.

किरीट सोमय्यांना खूप वेळ आहे हवं तर त्यांनी माझ्या घरी चहापानाला यावं मी माझे सगळे अकाऊंट डिटेल्स द्यायला तयार आहे, असं आवाहन अक्षता नाईक यांनी केलं आहे. 
 
आम्हाला संरक्षण दिलं होतं, ते काढून घेतले होतं, आम्ही ठरवलं होतं संरक्षणाशिवाय जगायचे, पण मला मुलीसाठी संरक्षण घ्यायचे म्हणून मी गृहमंत्र्यांना भेट घेतली असं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे. 

माझे पती आणि सासू बेशुद्ध होते, तपास अधिकाऱ्याने ते बघितले होतं, तेव्हा जर मदत झाली असती तर दोघांचे जीव वाचले असते, कुणाच्या दबावाखाली तपास अधिकार्‍यांने माझ्या नवर्‍याला आणि सासूला मरायला सोडलं त्याची चौकशी करावी अशी मागणी अक्षता नाईक यांनी केली आहे. 

अलिबागमधल्या कोर्लई गावात असलेली जमीन अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. याबाबत बोलताना अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ही जमीन भाजपचं सरकार असताना विकली होती, तेव्हा भाजप नेत्यांनी हा विषय का काढला नाही, आता किरीट सोमय्या याचं राजकारण करत असल्याचा आरोपही आज्ञा नाईकने केला आहे. 

अर्णब गोस्वामीबरोबर प्रत्येक वेळी किरीट सोमय्या कोर्टात असायचे म्हणजे ते जाहीर म्हणतायत अर्णब आमचा आहे असंही आज्ञा नाईकने म्हटलं आहे.