क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं- गडकरी

अनेकवेळा आपला पराभव होईल असे वाटते पण अचानक चित्र पालटते

Updated: Nov 14, 2019, 11:20 PM IST
क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं- गडकरी

मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते. एखादवेळी तुम्हाला आपण सामना हरतोय, असे वाटत असते. परंतु, निकाल अगदी उलट लागतो, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परस्थितीविषयी विचारण करण्यात आली. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकार स्थापनेबाबत विचारणा केली असता तुमचा प्रश्न योग्य आहे मात्र तो तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात. मी नुकताच दिल्लीतून परतलो आहे. मला महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची नेमकी माहिती नाही. मात्र, क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते. अनेकवेळा आपला पराभव होईल असे वाटते पण अचानक चित्र पालटते आणि निकाल तुमच्याबाजूने लागतो, असे गडकरी यांनी म्हटले.

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

त्यामुळे महाराष्ट्रात भाजपकडून काही अनपेक्षित फासे टाकले जाणार का, याविषयी चर्चेला सुरुवात झाली आहे. आज मुंबईत झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा भाजपशिवाय कोणाचेही सरकार येऊ शकत नाही, असे म्हटले. तसेच सर्व आमदारांना सत्तास्थापनेवेळी मुंबईत बोलावू, पण सध्या लोकांमध्ये जाऊन काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे गडकरी आणि फडणवीस यांच्यामध्ये भाजपचंच सरकार येणार, हा आत्मविश्वास कुठून आला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाला सरकार न स्थापन करता आल्यामुळे मंगळवारपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सध्या सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांची सध्या आपापसांत बोलणी सुरु आहेत. तर भाजप या सगळ्यावर बारकाईने नजर ठेवून असून योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे.