राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

सरकार स्थापन करताना मुंबईत बोलावू, पण सध्या काम करा

Updated: Nov 14, 2019, 10:31 PM IST
राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी म्हटले की, राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल. भाजपशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे शक्य नाही. सर्व आमदारांना सत्तास्थापनेवेळी मुंबईत बोलावू, पण सध्या लोकांमध्ये जाऊन काम करा, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला. 

या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आमदारांना मार्गदर्शन केले. एकूणच भाजप नेते आपल्या आमदारांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसले. यावेळी एका प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषणही करण्यात आले. 

'संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे गोबेल्स; शिवसेनेला पुन्हा NDA त स्थान नाही'

दादरच्या वसंतस्मृती येथील कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपप्रणित आघाडीतील घटकपक्षांचे नेते आणि भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार उपस्थित होते.

'भाजप सत्तास्थापनेचे तीन अंकी नाटक पाहतोय'

दरम्यान, या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सध्या राज्यात सुरु असलेले सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटक पाहत असल्याचे म्हटले. तसेच भाजपमध्ये होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबतही त्यांनी माहिती दिली. राज्यभरातील ९० हजार बुथवर या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत.  याशिवाय, आगामी दोन दिवसांमध्ये भाजपचे शहरी आणि ग्रामीण भागातील आमदार राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करतील. यावेळी ते नुकसान भरपाई आणि पीकविम्याची रक्कम मिळवण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीची माहिती घेतील, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.