अर्णब गोस्वामींची आजची रात्र देखील कोठडीतच

अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आजची रात्र देखील न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. कारण...

Updated: Nov 6, 2020, 06:24 PM IST
अर्णब गोस्वामींची आजची रात्र देखील कोठडीतच  title=

मुंबई : अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आजची रात्र देखील न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) त्यांच्या जामीन अर्जावर सुरू असलेली सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत शनिवारी दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. 

एकीकडे हक्कभंगप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक न करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेत. त्यामुळे सध्या तरी अर्णब गोस्वामींना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे अर्णब यांना केलेली अटक बेकायदेशीर असून ही केस बंद करावी यासाठी अर्णब गोस्वामी यांच्यावतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

वकिलांची फौजच उभी

यावेळी गोस्वामी यांच्यासाठी वकिलांची फौजच उभी करण्यात आली. आबाद फोंडा, हरीश साळवे, अमित देसाई यांनी गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद केला. मात्र सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज होऊ शकला नाही. त्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालय न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर अर्णबच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला.

अटक न करण्याचे निर्देश

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेने पाठवलेल्या हक्कभंग नोटीस प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. हक्कभंगप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक न करण्याचे निर्देशही न्यायालयाने विधानसभेला दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी अर्णब गोस्वामी यांना दिलासा मिळाला आहे. 

तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी गोस्वामींना पाठवलेले गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याबाबत विधानसभा सचिवांनी पत्र पाठवून विचारणा केली होती. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच सचिवांनी असा प्रश्न विचारलाच कसा, असा संतप्त सवाल सरन्यायाधिशांनी केला. तसेच न्यायालयाने सचिवांविरोधात न्यायालयाच्या अवमानासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोस्वामींचे वकील अॅड हरीश साळवे यांनी न्यायालयाने या पत्राची सू मोटो दखल घेण्याची विनंती केली होती. 

काय आहे प्रकरण?

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचे काम केले होते.  स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी ५  कोटी ४० लाख इतके बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणे होते. बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब तसेच  फिरोज शेख, नितेश सारडा यांना जबाबदार धरले होते. तसेच  रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.