'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.   

राजीव कासले | Updated: Feb 13, 2024, 01:49 PM IST
'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट title=

Maharashtra Politics : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अशोक चव्हाण यांनी अखेर भाजप प्रवेश केला (Ashok Chavan join BJP).  दुपारी एक वाजता भाजप कार्यालयता अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोच चव्हाण यांच्या पक्षप्रेवशामुळे महाराष्ट्रात भाजपची आणि महायुतीची शक्ती आणखी वाढली आहे असं सांगितलं.  देशभरात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ज्याप्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरु केलं आहे आणि जे परिवर्तन भारतात दिसायला लागलं त्यामुळे देशातील अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्यप्रवाहात काम करावं, मोदींसारख्या एका मजबूत नेतृत्वात काम करावं, मोदींचा देशाला पुढे नेण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांमध्ये आपणही वाटा उचलावा असे विचार अनेक नेत्यांमध्ये आलेत. यातलं एकप्रमुख नाव म्हणजे अशोक चव्हाण असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केलाय. त्यांनी केवळ इतकंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेत योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी पदाची कोणतीही अपेक्षा नाही, लालसा नाही.  अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रीपदं ज्यांनी भूषवली. आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्दी आपल्याला पाहिला मिळाली असे ज्येष्ट नेते अशोक चव्हाण, आाज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत ही आनंदाची बाब असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार राजूरकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश केला. 

राज्यसभेचा अर्ज भरणार
अशोक चव्हाणांचा प्रवेश होताच भाजप आपल्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.. तर अशोक चव्हाण उद्या राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. 

कार्यालयावरील बॅनर हटवले
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. येथील अशोक चव्हाणांचे फोटो असलेले बॅनर आज सकाळी हटवण्यात आलेत. नांदेडच्या जिल्हा शहर काँग्रेसच्या कार्यालवारून येणा-या काळात वाद निर्माण होऊ शकतो. हे कार्यालय अशोक चव्हाणांच्या ताब्यात जाणार की काँग्रेसकडेच राहणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

काँग्रेस अलर्ट मोडवर
काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह तोडगा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरील पक्षांतर्गत रोष कमी करण्यासाठी बाळासाहेब थोरातांना पुन्हा ताकद दिली जाणार आहे असं समजतंय. बाळासाहेब थोरातांना राज्यसभा निवडणूक आणि पक्ष संघटना बांधण्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.. मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांच्याकडून थोरातांना कॉल आल्याचंही समजतंय. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून हालचाली सुरु झाल्यात.. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार हे जवळपास निश्चित झालंय..