मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामागील खरा डाव लोकांच्या लक्षात आलाय, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, २५ तारखेला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. मात्र, त्याने काहीही साध्य होणार नाही.
सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचा फायदा घेऊन उद्धव यांना मतांची बेगमी करायची आहे. परंतु, उद्धव ठाकरेंचा हा डाव जनतेच्या लक्षात आला आहे. ते केवळ राजकारणासाठी हे सर्व करत असल्याचे लोकांनी ओळखले आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते.
द्धव ठाकरे अयोध्येला जाऊन तिथल्या सगळ्या पक्षकारांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे इतर नेतेही असणार आहेत. संत समाजाच्या प्रतिनिधींची राम मंदिराबाबत काय भूमिका आहे ते उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत.