मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसतेय. मुंबईच्या वरळी मतदार संघातून शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे २७ वर्षीय सुपुत्र आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. शिवसेनेची समाधानाची बाब म्हणजे, आदित्य ठाकरे यांना मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेकडून पाठिंबा मिळालाय. मुंबईतील डबेवाले आदित्य ठाकरे यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार करणार आहेत.
आदित्य ठाकरे उद्या अर्थात गुरुवारी रितसर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, त्यांच्यासोबत डबेवाले कार्यकर्तेही असणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी प्रचार कसा करायचा? प्रचाराची रणनीती काय असेल? यावर संघटना विचार करत आहे.
Maharashtra elections have been called for! The festival of democracy and the right to choose your own government, your own destiny is now!
“हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची”— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 21, 2019
आदित्यच्या रूपात प्रथमच ठाकरे घराण्यातली व्यक्ती निवडणूक लढत असल्यानं शिवसैनिकांतही एक उत्साह दिसून येतोय. आदित्य ठाकरे २००९ सालापासून राजकारणात सक्रीय आहेत आणि एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याचं शिवसैनिक सांगतात.
आपल्या 'जन आशीर्वाद' यात्रेदरम्यान त्यांनी 'आदित्य संसद'ही आयोजित केल्या होत्या.
आदित्य ठाकरे वरळी या त्यामानाने 'सुरक्षित' समजल्या जाणाऱ्या मतदार संघातून बिनविरोध निवडून यावेत, यासाठी शिवसेनेकडून हरएक तऱ्हेचे प्रयत्न होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या २७ जणांच्या नावाच्या यादीत वरळी या मतदारसंघाचा समावेश नाही. तर गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आदित्य यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याची विनंती केल्याची चर्चा होती. परंतु, वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.