मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांचा ९ हा लकी नंबर आहे. राज ठाकरे यांच्या या आवडत्या ९ अंकाचं रहस्य कायम आहे. त्यांचं शिवसेना सोडण्याची घोषणा करणं, शिवसेना सोडणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची घोषणा, शिवतीर्थावरील मनसेची पहिली सभा या सर्वांमध्ये कुठे ना कुठे तरी ९ आकडा डोकावत होता.
९ मार्च २००६ ला मनसेची घोषणा झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मनसेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. पहिल्याच खेपेत मनसेचे १३ आमदार निवडून आले. तर, नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता आली.
मात्र, पुढील निवडणुकीत राज ठाकरे यांची मनसे आपला करिष्मा कायम ठेवू शकली नाही. गेल्या पाच वर्षात मनसेचे अस्तित्व अधून मधून डोकावत होते. पण, ते अन्य पक्षाप्रमाणे दिसले नाही. स्वतः राज ठाकरे काही काळ आजारी होते. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मातोश्री यांना कोरोना झाला.
राज ठाकरे यांचा ९ हा लकी क्रमांक आहे. तर, ज्योतिष शास्त्रानुसार त्यांची रास मकर आहे. २९ एप्रिलला शनीने आपल्या मूळ कुंभ राशीत ३० वर्षानंतर प्रवेश केला आहे. याचा मकर राशीवर फार चांगला परिणाम होणार आहे.
शनीची साडेसाती सुरु होते तेव्हा त्याचा प्रभाव तीन राशींवर होत असतो. साडेसातीचे तीन चरण असतात. त्यातील पहिल्या टप्यात आगामी नुकसानीची चाहूल शनी महाराज देत असतात. दुसऱ्या चरणात शनी महाराज थेट नुकसान करत असतात. तर तिसऱ्या चरणात त्या राशीला शुभ फळे देतात.
पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन चरणात मकर राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागले. आता मकर राशीत शनीचे तिसरे चरण सुरु होत आहे. त्यामुळे कुंभ राशीतील शनीचे मार्गक्रमण हे मकर राशीच्या लोकांचा मान-सन्मान वाढवणारे सिद्ध होणार आहे.
ज्या राशीवर शनीची वक्रदृष्टी अर्थात साडेसाती सुरु होते. त्यावेळी शनीच्या कोपाची तीव्रता कमी करण्यासाठी दर शनिवारी शनी मंदिर किंवा हनुमान मंदिरात जावे. हनुमानाला शेंदूर अर्पण करावा. या शिवाय या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करावे हा उपाय सांगितला जातो.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या एक महिन्यात घेतलेलं निर्णय पाहता त्यांची वाटचाल 'राज'मार्गाकडे चालली असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर स्पीकरवर हनुमान चालीसा वाजविण्यात येईल असा इशारा दिला. याच सभेत त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली.
राज यांच्या या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात भगवे वादळ घोंघावू लागले. राज यांच्या एका गर्जनेमुळे गल्ली ते दिल्लीपर्यत भोंग्याविरोधात आवाज दणाणला. यामुळे मनसैनिकांनी त्यांना 'हिंदू जननायक' ही पदवी बहाल केली.
१ मे महाराष्ट्रदिनी त्यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले. राज ठाकरे यांच्या यापूर्वीही अनेक सभा झाल्या. अगदी शिवतीर्थ त्यांच्या भाषणांनी गाजलं. पण, औरंगाबाद येथील सभेसाठी जे वातावरण तयार करण्यात आलं. ठिकठिकाणी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पुण्यात वेद मंत्र पठण करून त्यांना पुरोहितांनी आशीर्वाद दिले.
शनीच्या साडेसातीचे तिसरे चरण मकर राशीत पडत असताना राज ठाकरे यांनी नेमकं हनुमान चालिसाचं पठण करण्याचा आदेश मनसैनिकांना दिला. हा योगायोग समजावा की हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे शनी महाराजांनी दिलेला आशीर्वाद?