आधी दारु प्यायले नंतर भांडभांड भांडले अन्... बदलापुरात पतीचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

Badlapur Crime : बदलापुरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु असल्याचीही माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 29, 2023, 10:21 AM IST
आधी दारु प्यायले नंतर भांडभांड भांडले अन्... बदलापुरात पतीचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात (Badlapur Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पती-पत्नीच्या वादातून एक क्रूर घटना घडली आहे.  पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना बदलापूरच्या मांजर्ली परिसरात घडलीय. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस (Badlapur Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बदलापुरच्या मांजर्ली परिसरातील दिव्यज्योत अपार्टमेंटमध्ये आरोपी ओमप्रकाश विश्वकर्मा आणि त्याची पत्नी अनिता विश्वकर्मा हे कुटुंबियांसह राहत होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मयत अनिता आणि तिचा पती ओमप्रकाश हे दोघेजण दारू प्यायला बसले होते. यावेळी त्यांचे पुन्हा वाद झाले. याच वादातून आरोपी ओम प्रकाश विश्वकर्मानं पत्नी अनिताची गळा आवळून हत्या केली. 

या घटनेमुळं मांजर्ली परिसरात एकच खळबळ माजली होती. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी ओम प्रकाश विश्वकर्माच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलीय.

बदलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पती पत्नी कुटुंबियांसह एकत्र राहत होते. दोघांमध्येही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे व्हायचे. सोमवारी संध्याकाळी दोघेही दारु प्यायला बसले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाला. हे भांडण इतकं वाढलं ओमप्रकाशला राग अनावर झाला. रागाच्या भरात ओमप्रकाशने पत्नीची गळा दाबून हत्या केली. नेहमीप्रमाणे झालेल्या भांडणातून आरोपी पतीने पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने पत्नीच्या भावाला फोन करून हत्येची माहिती दिली. या हत्येनंतर भावाने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती.

भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच पतीच्या घरी धाव घेतली होती. पोलिसांनी घरी जाऊन पाहिले असता पत्नी घरच्या पलंगावर मृत अवस्थेत पडलेली होती. पोलिसांनी तात्काळ तपास करत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे.