राज ठाकरेंनी फोटो शेअर करून दिला बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा

आजच मुंबईत मनसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडत आहे.

Updated: Jan 23, 2020, 11:46 AM IST
राज ठाकरेंनी फोटो शेअर करून दिला बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेच्या ट्विटर हँडलवरून राज ठाकरे आणि बाळासाहेबांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अमित ठाकरे हेदेखील दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती आहे. यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवरील येथील स्मृतिस्थळावर दाखल झाले आहेत. 

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. तर आजच मुंबईत मनसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडत आहे. काहीवेळापूर्वीच राज ठाकरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. 

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब आजही जनतेसाठी प्रेरणादायी आहेत. ते अत्यंत कर्तृत्ववान आणि कोणापुढेही न झुकणारे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आवाज उठवायला कधीच मागेपुढे पाहिले नाही, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.