मुंबई: मोदी सरकारने शनिवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अत्यंत निराशादायी असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते मु्ंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबई आणि महाराष्ट्राला सर्वाधिक कर देतात. हा बजेट म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असा प्रकार आहे.
केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, असे सांगते. मात्र, त्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विकासदर ११ टक्के असला पाहिजे. सध्याच्या घडीला तो केवळ ११ टक्के इतका आहे. मग, सरकार कृषी क्षेत्राचा विकासदर पाचपट कसा वाढवणार?, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला.
Budget 2020: मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त लांबलचक, आतून मात्र पोकळ- राहुल गांधी
एकंदरच मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा कुचकामी आहे. नव्या रोजगारांची निर्मिती होणार नाही. तोपर्यंत विकास होणार नाही. देशभरात १०० स्मार्ट सिटीज उभारण्याच्या सरकारच्या घोषणेचे काय झाले? देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना भांडवली बाजार कोसळणे, हे कसले निदर्शक म्हणायचे, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.
Budget 2020 : निर्मला सीतारामन यांच्या नावे सर्वात मोठ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम
तसेच केंद्र सरकारच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची गती वाढवण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा आहे? तरीही या प्रकल्पाचा जास्त खर्च महाराष्ट्राला उचलावा लागेल. आम्ही याला विरोध करू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.