मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून, देश विदेशातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने एक भव्य संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे.
मुंबईतील कलिना कॅम्पससमोरील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 3 एकर जागेवर हे महाविद्यालय उभारलं जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचं दिदींचं स्वप्न होतं. पण वेळेत जागा उपबल्ध न झाल्याने त्यावेळी ते होऊ शकलं नाही. यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच समितीने या महाविद्यालयाचं नाव लता दीनानाथ मंगेशकर ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता.
संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज आणि अत्याधुनिका सोयी सुविधांनी युक्त असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्याल स्थापन करण्याचं लता मंगेशकर यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे.