मुंबई : नवनीत राणा यांच्या विरोधात आता भीम आर्मीही मैदानात उतरली आहे. नवनीत राणांविरुद्ध खार पोलीस ठाण्यात संघटनेतर्फे तक्रार करण्यात येणार आहे. उच्चवर्णीय नसल्यामुळे पाणी दिलं नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत आरोप खोटा असल्याचा दावा केला. आता जातीच्या नावाखाली खोटं बोलल्याबद्दल राणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीनं केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने याबाबत मुंबई पोलिसांना 24 तासात उत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या.
संजय पांडे यांनी राणांचा खार पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ ट्विट केल्यानंतर राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एक दावा केला. राणांना खार पोलीस स्टेशनमध्ये नव्हे तर सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये हीन वागणूक दिल्याची तक्रार केल्याचा मर्चंट यांचा दावा आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून सांताक्रूझ पोलीस स्टेशनचा व्हिडिओ रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे राणा आणि त्यांचे वकील रिझवान मर्चंट खोटा दावा करतायत की काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणांचा पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ ट्विट केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झालीय. कारण नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्यात पाणीही न दिल्याचा पोलिसांवर खोटा आरोप केल्याप्रकरणी राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.