मुंबई : अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आपला बायोडेटा टाकत काम देण्याची विनंती केलीय. काय घडलंय, तुम्हीच बघा. अमिताभ बच्चन यांचा सिने जगतात प्रवेश होण्यापूर्वी सिनेमात वेगळं विनोदी पात्र असायचं.
मात्र अमिताभ बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर झाले आणि त्यांच्या सिनेमात वेगळा कॉमेडियन दिसणं बंद झालं. अँग्री यंग मॅन म्हणून त्यांची ख्याती भारतातच नव्हे तर जगभर पसरली. मात्र त्याचसोबत त्यांच्यातला ह्युमर सेन्सही चाहत्यांना आकर्षित करत राहिला.
बिंग बिंच्या या विनोदबुद्धीची झलक नुकतीच ट्विटरवरही दिसली. त्याचं झालं असं.. पद्मावत सिनेमात राजा रतनसिंग साकारला होता शाहीद कपूरनं, तर पद्मावती होती दीपिका पदुकोण. आता राजापेक्षा राणीची उंची जास्त असल्यामुळं शूटिंगदरम्यान काय काय कसरती कराव्या लागल्या, याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं छापली.
आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' या आगामी सिनेमातही कतरिना कैफ नायिका असल्यामुळं हिच अडचण येत असल्याचा उल्लेखही त्या बातमीत आहे. या बातमीचा धागा पकडत बिग बींनी हे ट्विट केलंय. उंचीची अडचण असेल, तर आपला विचार करण्यात यावा, असं ते म्हणतात. त्यासाठी त्यांनी आपला बायोडेटाच ट्विट केलाय.
जॉब अप्लिकेशन
नाव - अमिताभ बच्चन
जन्मतारीख - 11.10.1942
वय - 76 वर्षं
अनुभव - 49 वर्षांचा अनुभव, सुमारे 200 सिनेमांत अभिनय. हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि बंगाली भाषांमध्ये पारंगत
उंची - 6 फूट, 2 इंच
माझा विचार करा. मग उंचीची अडचण येणार नाही.
निखळ विनोद गुदगुल्या करतो, पण कधीच रक्तबंबाळ करत नाही, असं पुलंनी म्हटलंय. सोशल मीडियात सध्या तिरस्कारयुक्त पोस्टना पूर आलेला असताना, बिग बींच्या या निखळ विनोदी ट्विटमुळं 'लंबू' म्हणून ओळख असणाऱ्या बिग बींची उंची अधिकच वाढलीय.