मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजपच्या चार जागा हक्काच्या आहेत. याशिवाय भाजपने प्रसाद लाड ( PRASAD LAD ) यांना पाचव्या जागेसाठी उमदेवार देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली असतानाच आता सहाव्या जागेसाठी उमेदवारी देऊन भाजपने या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक मारला आहे.
विधानपरिषदेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे ( PANKAJA MUNDE ) यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. मात्र, पंकजा यांचे नाव दिल्ली येथून आलेल्या यादीतून वगळण्यात आले होते. तर, भाजपचे सहयोगी पक्ष असलेले शिवसंग्रामचे विनायक मेटे ( VINAYAK METE ) यांचेही नाव यादीत नव्हते.
विनायक मेटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( DEVENDRA FADNAVIS ) यांची भेट घेऊन आपली नाराजी दर्शविली होती. मेटे यांच्या नाराजी नाट्यानंतर इंदापूरचे माजी मंत्री आणि आमदार हर्षवर्धन पाटील ( HARSHVARDHAN PATIL ) यांचंही नाव चर्चेत आलं होतं.
भाजपने पाच नावे जाहीर केल्यामुळे आणखी एक नाव पुढे येईल याची शक्यता नव्हती. मात्र, भाजपने आज मास्टरस्ट्रोक मारला. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अपक्ष उमेदवारीला भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे पाच आणि अपक्ष सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप एकूण सहा जागा लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.