मुंबई : 'शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत' असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या वर्षी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे. पायी वारीवर बंदी घालण्याच्या मुद्दयावर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
'सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा' असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून सरकारकडून पायी वारीला परवानगी देण्यात आलेली नाही. यंदाही आषाढीला पायी वारी सरकारने परवानगी नाकारली. बसनेच 10 मानाच्या पालख्या नेण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. पण सरकारचा हा नियम अनेक वारकऱ्यांना पटलेला नव्हता. भाजपने पायी वारीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. पायी वारीच्या पहिल्या दिवशी आपल्या समर्थकांसह पायी वारीला निघालेले हभप बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. त्यावरूनही भाजपनं सरकारवर टीका केली होती.
'आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्या सोबत मंचावर बसले आहेत. ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखविले. आता "अपना टाईम आया है'. शरद पवार यांनी महाराष्ट्रातून परिवर्तनाची सुरुवात केली आहे. ते आता दिल्लीचे तख्त बदलवून टाकतील. तेच दिल्लीमध्येही परिवर्तन घडवतील', असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं.