'भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत', नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण

मोदी-पवार भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

Updated: Jul 17, 2021, 06:36 PM IST
'भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत', नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगू लागली आहे. यावर बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, त्यामुळे या चर्चांमध्ये अर्थ नाही, असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. 

देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. काल पंतप्रधान मोदी यांनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाविषयी चर्चा केली होती. या बैठकीत राष्ट्रीय धोरण आखवं अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या मुद्दयावर चर्चा मोदी-पवार भेटीत चर्चा झाली तसंच लसींअभावी लसीकरणात अडथळा येत आहे. त्यामुळे लस पुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणीही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं. या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनाही कल्पना होती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. 

रेग्युलेटरी अॅक्टमध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते बँकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे सहकारी बँक ही एखाद्या धनाढ्य माणसाच्या ताब्यातही जाऊ शकते. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. या बदलांमुळे काय घडू शकतं याचं एक लेखी पत्रच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

याआधी शरद पवार संरक्षणमत्री राजनाथ सिंह यांनी आयोजित केलेल्या बैठकीतीतही उपस्थित होते. काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी हे देखील बैठकीला उपस्थित होते. सीमेवरील एकूणच तणावाची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. 

काही लोक 'तारीख पे तारीख' देत मी पुन्हा येईन सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो, मात्र यांचा अंदाज खरा ठरत नाही,' असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला. 

तपास यंत्रणा कोणत्या प्रकारे काम करत आहे?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केलीय. ईडीनं अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थान आणि आठ एकर जमीन मालमत्तेवर टाच आणलीय. त्यावरूनच नवाब मलिक यांनी टीका केलीय. त्यांचं वरळीतील घर 2005 साली झालं आणि जागेची खरेदी 2004 साली झाली. सचिन वाझे यांचे आरोप तर आताचे आहेत, मग तपास यंत्रणा कोणत्या प्रकारे काम करत आहेत? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. मनसुख हिरेन हत्येनंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या केबिनमध्ये सचिन वझे यांची बंद दरवाज्या आड बैठक झाली, मात्र तरीही परमबीर सिंग यांची चौकशी केली नाही, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.