मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं

मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी

Updated: Dec 8, 2019, 04:27 PM IST
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला अजून अडीच वर्षं शिल्लक असली तरी भाजपनं रणशिंग फुंकलं आहे. येणाऱ्या काही निवडणुका लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डच्या बैठका घेतल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक चांगलं यश पक्षाला मिळाले आहे. संघटनात्मक फेरबदल करण्याच्या दृष्टीनं तसंच पक्षवाढीसाठी ही बैठक सुरू असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. 

मुंबईत दादरमधल्या वसंत स्मृतीमध्ये भाजपची संघटनात्मक बैठक सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही सतिश, महाराष्ट्र संघटन मंत्री विजय पुराणिक या बैठकीला उपस्थित आहेत.

राज्यात युती तुटल्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार दिला नव्हता. पण त्याआधी मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढल्यानंतर ही भाजपने शिवसेनेला मुंबई महापालिकेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर पालिकेत शिवसेनेची सत्ता आली. पण आता राज्यात भाजपसोबतची युती तोडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेना-भाजपमधील दुरावा आणखी वाढत गेला. 

मुंबई महापालिकेतील सत्ता ही शिवसेनेसाठी नेहमी अस्मितेचा विषय राहिला आहे. त्यामुळे शिवसेना मुंबईतील सत्ता कायम ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये सरळ लढत झाली होती.

सध्या महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना ९४

भाजप ८२

काँग्रेस २९

राष्ट्रवादी ८

समाजवादी पक्ष ६

मनसे १