भाजप रिपाईसाठी लोकसभेची एकही जागा सोडणार नाही- फडणवीस

रामदास आठवलेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Updated: Mar 20, 2019, 08:39 AM IST
भाजप रिपाईसाठी लोकसभेची एकही जागा सोडणार नाही- फडणवीस title=

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रामदास आठवले यांच्या रिपाईसाठी एकही जागा सोडण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची नाव संसदीय समिती बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आली आहेत. यंदा २०१४ पेक्षाही मोठी लाट असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. मात्र, रिपाईसाठी एकही जागा न सोडण्याच्या निर्णयानंतर आता रामदास आठवले काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दाऊदला शरणागती का दिली नाही याचा पवारांनी खुलासा करावा- आंबेडकर

गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली होती. यावेळी लोकसभेसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ असे सूत्र निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी रिपाईला एकही जागा न दिल्याने रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमची उपेक्षा करण्यात आली आहे. हा दलित समाजाचा अपमान आहे, असे आठवले यांनी म्हटले होते. त्यांनी दक्षिण-मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी घोषित करून आठवले यांचा पर्याय बंद केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही रिपाईसाठी जागा सोडता येणार नसल्याचे सांगत हात वर केले आहेत.