विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीसांची निवड

विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्यानंतर... 

Updated: Dec 1, 2019, 11:12 AM IST
विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीसांची निवड title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर रविवारच्याच दिवशी विरोधी पक्षनेत्यांचीही निवड होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात येणार असल्याचं कळत आहे. दरम्यान, शनिवारी विधानसभेच्या कामकाजात भाजप नेत्यांनी प्रचंड गदारोळ केल्यानंतर विधानसभेच्या रविवारच्या कामकाजात विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा समावेश करण्यात आला नव्हता. 

शनिवारपासून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चा आणि त्यानंतर रविवारी सकाळी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. याच धर्तीवर विरोधी पक्षाची सर्व नेत्यांतडून प्रशंसाही करण्यात आली. परिणामी विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निव़डही रविवारीच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

लांबणीवर गेली होती निवड

शनिवारचा सभात्याग आणि गदारोळीनंतर भाजपच्या भूमिकेवर अनेकांनी नाराजदी व्यक्त केली होती. परिणामी रविवारच्या विधानसभा कामकाजाच्या वेळापत्रकात विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा समावेश करण्यात आला नव्हता. विरोधकांनी पहिल्या दिवशी जी आक्रमक भूमिका घेतली होती त्याला उत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड लांबणीवर टाकण्याची खेळी केली होती.

किंबहुना ही निवड  थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. विरोधकांच्या आक्रमक रणनितीला हे सत्ताधारी महाविकास आघाडीचं उत्तर होतं. पण, विधानसभेत याचे पडसाद उमटण्यापूर्वीच भाजपकडून संख्याबळाअभावी कटूता आणखी न वाढवता अध्यपदासाठीच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या आधारे काँग्रेसच्या नाना पटोलेंची अध्यक्षपदी बिनविरोध निव़ड झाली. तेव्हा आता फडणवीसांची विरोधी पक्षनेत्यापदी निवड होत आहे.